अखेर चापानेर जि. प. शाळेचे कुलूप उघडले पंधरा दिवसांत शिक्षक देण्याचे लेखी आश्वासन

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या निषेधार्थ पालक व ग्रामस्थांनी चापानेर येथील जि. प. शाळेला ठोकलेले कुलूप अखेर सोम वारी उघडले. 

गटशिक्षण अधिकारी मनीष दिवेकर यांनी पंधरा दिवसांत शिक्षक उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले. गणित, इंग्रजी व विज्ञान विषयांसाठी तीन शिक्षक तसेच लिपिक देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर करण्याचेही पत्र देण्यात आले.

कन्नड तालुक्यातील चापानेर जि. प. शाळेत गेल्या चार-पाच वर्षांपासून शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी करत ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले होते. दिवसभर वरिष्ठ कार्यालयातील कोणीही न आल्याने पालकांमध्ये नाराजी होती. 

अखेर गटशिक्षण अधिकारी मनीष दिवेकर, शिक्षणविस्तार अधिकारी राजेंद्र पाटील व धनराज अशोक जगताप, केंद्रप्रमुख योगेश सूर्यभान सोनवणे आणि केंद्रीय मुख्याध्यापक ईश्वर वैष्णव यांच्या उपस्थितीत पालक व ग्रामस्थांशी चर्चा झाली. दिवेकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर कुलूप उघडले. यावेळी सरपंच कल्याण पवार, जगन आबा पवार, ज्ञानेश्वर घुले, रणजीत पवार, संतोष पवार, सोमनाथ घुले, मनसुब पवार, सीमा हसणे उपस्थित होते.